गण गण गणांत बोते

Welcome To Gajanan Maharaj Website

गजानन महाराज” हे महाराष्ट्रातील एक संत होते.महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे.

शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्रभारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया)चे भारतीय गुरू होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून, आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी ‘ श्रीगजानन विजय’ ग्रंथामध्ये लिहिले आहे.

इतिहास

माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी ३० वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, “कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||”

महाराजांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो.

असे म्हटले जाते की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कोलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे राहुन त्यांनी बाललीला दाखवल्या. मग, स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभुती करून दिली व गुरुदिक्षा दिली मग तिथुन गजानन महाराज शेगावी आले.

इतिहास

महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे, किंवा अंगणात, ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

महाराजांना झुणका भाकरीसोबतच [मुळा|मुळ्याच्या] शेंगा, हिरव्या मिरच्यापिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.

मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.

शरीरयष्टी

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती.पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे.

उपदेश

महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.

समाधि

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला.

समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, “आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||”

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती.

महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीरगुलालफुलेतुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, “जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरूपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||” आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.

८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली.